साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको; भाजपचा शरद पवारांवर निशाणा

मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (07:18 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधान होते, तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातून पंतप्रधान का होऊ शकत नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी पंतप्रधान मोदींची तुलना नको, असा पलटवार करण्यात आला आहे.
 
आता काळाची गरज आहे. देशात परिस्थितीत कुरक्षेत्रात झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षात महाराष्ट्र आणि देश कसा असावा याचा विचार करावा लागणार आहे. यासाठी सेनापती म्हणून शरद पवार आज आपल्यासोबत आहे. त्यांच्या विचारांना घेऊन आपल्याला पुढे लढावे लागणार आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले होते. याला भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे. ‘फरक आहे… पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडून आले. त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको’, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांचे कौतुक करत त्यांनी देशाचे नेतृत्व करावे अशी मागणी केली होती.
 
दरम्यान, आताच्या घडीला देशभरात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. धार्मिक उन्माद उफाळून आला आहे. प्रत्येक समाजामध्ये टोकाच्या भूमिका निर्माण झाल्या आहे. देशाला शरद पवारांच्या नेतृत्त्वाची गरज आहे. २६ खासदार असलेली गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही. असा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती