नगरकरांसाठी मोठी बातमी ! अहमदनगरहून दोन डब्यांची रेल्वे आष्टीपर्यंत धावली

शनिवार, 11 डिसेंबर 2021 (20:40 IST)
जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या नगर-बीड-परळी या 261 किलोमीटर अंतराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे.या मार्गावरील सर्वात मोठा आणि लांब असलेल्या मेहेकरी नदीवरील पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले. येत्या काही दिवसांमध्ये नगर ते आष्टी या 60 किलोमीटर मार्गावर हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे.
त्याचीच पूर्वतायरी म्हणून गेल्या दहा दिवसांपासून रेल्वेचे इंजिन नगरहून आष्टीपर्यंत दररोज धावत आहे.विशेषबाब म्हणजे नगर ते कडा या स्थानकांदरम्यान दोन डबे घेऊन एक रेल्वे पाठवण्यात आली. ही रेल्वे चाचणी यशस्वी झाली आहे.
लवकरच आता बीडपर्यंत रेल्वे धावण्याचे स्वप्न साकार होणार असल्याने बीडकर सुखावले आहे.नगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 261 किमी रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली होती.
दरम्यान मागील दोन वर्षात नगर ते नारायण डोह आणि नागायण डोह ते सोलापूरवाडी अशा दोन टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली.आता या मार्गात येणाऱ्या सर्वात मोठ्या कुंठेफळ येथील मेहेकरी ब्रीजचे काम पूर्ण झाले आहे.आता सोलापूरवाडी ते आष्टी या 32 किमी अंतराची चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेचे उप मुख्य अभियंता विजय कुमार रॉय यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती