भागवत कराड : 'पंकजा मुंडे आणि माझ्यातले गैरसमज दूर झाले आहेत'

बुधवार, 14 जुलै 2021 (23:21 IST)
नीलेश धोत्रे
"पंकजा मुंडेंबरोबर मिस कम्युनिकेशन झालं होतं, पण आता ते राहिलेलं नाही," असं नुकताच पदभार स्वीकारलेले अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
 
पंकजाताईंबरोबर सविस्तर चर्चा झाली आहे, सर्व गैरसमज दूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. कराड-मुंडे कुटुंबीयांच्या संबंधांवरसुद्धा त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे.
 
तसंच मराठवाड्याच्या विकासासाठी पावल उचणार असल्याचं जाहीर करत येत्या 17 सप्टेंबरला मराठवाड्यातल्या जनतेला काहीना काही तरी आनंदाची बातमी देऊ, असं कराड यांनी बीबीसीच्या मुलाखतीत म्हटलंय.
केंद्राकडे थकलेला महाराष्ट्राचा जीएसटी यावरसुद्धा काम करण्याची ग्वाही कराड यांनी दिलीय.
 
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांना भागवत कराड यांनी दिलेल्या सविस्तर मुलाखतीचा हा संपादित अंश.
पंकजाताईंबरोबरची भेट कशी झाली, त्यावेळी काय काय चर्चा झाली?
 
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे दिल्लीत आल्याच मला समजलं. मी त्यांना फोन केला. त्यांनी मला बोलावून घेतलं. आमची सविस्तर चर्चा झाली.
 
तुम्ही दिल्लीत आल्याचं मला सांगायचा पाहिजे होतं, असं ताई बोलल्या. पण पक्षाकडूनच असा आदेश होता की कुणाशी काही बोलू नये.
 
म्हणून मी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, पंकजाताई किंवा विनोद तावडे यांना कुणाला काही बोललो नाही. कारण मलासुद्धा कन्फर्म माहित नव्हतं.
 
मलासुद्धा असा फोन आला की राष्ट्रीय अध्यक्षांना तुम्हाला भेटायचं आहे, सहा तारखेला रात्री मला दिल्लीला बोलावण्यात आलं. सात तारखेला मला सकाळी 11 च्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आलं.
घडामोडी एवढ्या फास्ट होत होत्या, मला कल्पना नव्हती. मी माझ्या नातेवाईकांनासुद्धा सांगू शकलो नाही. त्यामुळे शपथविधीलासुद्धा कुणालाही बोलावता आलं नाही. म्हणून माझ्या तर्फे म्हणा किंवा ओव्हर ऑल काहीतरी मिस कम्युनिकेशन झालं म्हणा.
 
राजकारणात निर्णय घेण्याची योग्य वेळ असते, असं पंकजाताई म्हणाल्या आहेत, तम्ही त्यांना फार पूर्वीपासून ओळखता. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका काय अर्थ आहे असं तुम्हाला वाटतं?
 
पंकजाताईंना मी अगदी लहानपणापासून ओळखतो. त्यांचे माझे अगदी घरचे संबंध आहेत. 1995 साली मी मुंडे साहेबांच्या नेतृत्वातच भाजपमध्ये आलो. त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठा झालो. असा एकही दिवस नाही की त्यांची आठवण येत नाही.
 
त्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीत मी सहभागी झालो आहे. अजूनही पंकजाताई नेत्या आहेत हेच मी म्हणतो. त्यामुळे त्या जे बोलल्या आहेत त्यात वेगळा काहीच अर्थ नाही आणि पंकजाताईंचं आणि माझं सविस्तर बोलणं झालंय.
 
अगदी मनमोकळेपणाने बोलणं झालं. त्यांचं म्हणणं एकच होतं की मला आधी कळवलं असतं तर जसं मी तुमचा खासदारकीचा फॉर्म भरण्यासाठी आले तसं मी शपथविधीलासुद्धा येऊ शकले असते. हा गैरसमज झाला नसता.
 
तुमचं मंत्रिपद म्हणूनच असं नाही, पण एकंदरच पंकजा मुंडे पक्षाच्या राजकारणावर नाराज आहेत असं वाटतं का?
 
एकंदरीतच मला असं वाटतं की त्या शपथविधीला आल्या असल्या तर नाराजीच राहील नसती. त्यावेळी त्या मला तसं बोलल्या होत्या. पण पक्षातल्या नाराजीबद्दल मी काही सांगू शकत नाही. त्याबद्दल त्याच बोलू शकतील.
 
देशाची आर्थिक स्थिती बिकट असताना केंद्रीय अर्थ खात्याची जबाबदारी खांद्यावर येणं म्हणजे एक काटेरी मुकूट डोक्यावर आलाय असं वाटतं का?
 
मला याची कल्पना आहे. अर्थमंत्री हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे. सर्व विभागांसाठी हे महत्त्वाचं मंत्रालय आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच गोरगरिबांची स्थिती सुधारण्यावर भर देणं हे जबाबदारीचं काम या मंत्रालयाकडे आहे.
 
मी जरी नवीन असलो तरी सुरुवातीपासून सर्व विषयांचा अभ्यास करून, समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याची माझी सवय आहे. वेगवेगळे अधिकारी आणि अर्थतज्ज्ञांकडून मी सध्या मार्गदर्शन घेत आहे.
 
राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांचा फोन आला होता का, त्यांनी जीएसटीबाबत काही मागणी केली का?
 
महाराष्ट्राचे अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचा मला फोन आलेला नाही. पण मी महाराष्ट्राचा आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्याचा आहे.
 
मराठवाडा मगासलेला भाग आहे. 15 ऑगस्टनंतर मी मराठवाड्यात जाणार आहे. त्यानंतर मी विभागीय आयुक्तांशी बैठक करून मराठवाड्याला काय काय गरज आहे याचा आढावा घेणार आहे.
 
त्यानंतर जास्तीत जास्त आर्थिक मदत मराठवाडा आणि महाराष्ट्राला कशी मिळेल ते मी पाहणार आहे.
मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा मी आधी अध्यक्ष होतो. त्यामुळे मराठवाड्याचं मागासलेपण घालवण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे हे सर्व मला माहिती आहे. त्यावर जास्तीत जास्त काम करेन.
 
17 सप्टेंबरला यंदा मग मराठवाड्याला काही खूषखबर मिळेल का?
 
नक्कीच. मराठवाड्यासाठी यंदा नक्कीच आम्ही काहीना काहीतरी केंद्राकडून देण्याचा प्रयत्न करू. हा दिवस संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
महाराष्ट्राच्या केंद्राकडे थकलेल्या जीएसटीबाबत अधिकाऱ्यांशी किंवा निर्मला सीतारामण यांच्याशी काही चर्चा झाली आहे का?
 
जीएसटीच्या मुद्द्यावर कालच बैठक झालेली आहे. लॉकडाऊनमुळे जीएसटी कमी झालेला आहे. महाराष्ट्र शासन त्यांचं अपयश झाकण्यासाठी कायम केंद्राकडे बोट दाखवतं.
 
कोरोनाच्या काळात आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्राने महाराष्ट्राला मोठी मदत केली.
 
जीएसटीचंसुद्धा सर्व राज्यांना योग्य वाटप सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. पण मी महाराष्ट्रातला असल्यामुळे मी स्वतः आता जीएसटीमधला महाराष्ट्राचा किती हिस्सा बाकी आहे त्याची माहिती घेऊन तो त्वरित मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती