भिडेंनी एखादा आंबा सरकारला दयावा.. चार वर्षांनी का होईना 'विकास' तरी जन्म घेईल - सुनिल तटकरे

गुरूवार, 14 जून 2018 (15:13 IST)
निरंजन डावखरे साम, दाम, दंड, भेद या नीतीचे बळी - नजीब मुल्ला
 
रत्नागिरी - देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक जटील प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. संभाजी भिडेंनी या सर्व समस्येतून देशाला बाहेर आणण्यासाठी त्यांच्याकडील एखादा तरी आंबा या सरकारला दयावा. जेणेकरून चार वर्षांनी का होईना विकास जन्माला येईल, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
 
२०१४ साली झालेल्या निवडणुकीत सर्वत्र देशाचे चित्र बदलले. विद्यमान सरकारने ६० वर्षे काँग्रेस आघाडीने कोणतेच काम केले नाही असा विरोधाभास जनतेत निर्माण केला. मात्र भाजप सरकार निवडणुकीपुर्वी जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. १५ लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील असे स्वप्नं या सरकारने सर्वसामान्यांना दाखवले. पदवीधर झालेल्या युवकाला दरवर्षी २ कोटी रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला अाहे. आता हाच युवक येत्या निवडणुकीत परिवर्तन घडवून पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात हातभार लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना मोठे केले त्यांनी पक्ष सोडून पळ काढला. परंतु अशा वेळेस पक्षाने नजीब मुल्ला यांच्यासारखा कर्तृत्ववान युवकाला उमेदवारी दिली आहे. त्यांनी चार वेळा ठाणे महापालिकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी विजय संपादित केला. शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांचा चार वेळेस झालेला विजय ही त्यांच्या कामाची पावती आहे. कोकणातील समस्यांची योग्य मांडणी करुन त्या सोडवण्यासाठी नजीब मुल्ला हे कायम तत्पर राहतील असे आश्वासनदेखील यावेळी आ. सुनिल तटकरे यांनी दिले.
 
नजीब मुल्ला यांनी आपल्या मनोगतात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यावर तोफ डागत त्यांनी कोकणाचा आमदार असताना कधी मतदारसंघात फिरकले सुद्धा नाही, असा आरोप केला. डावखरे हे भाजपच्या साम,दाम,दंड,भेद या नीतीला बळी पडले आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. ज्या पदवीधर युवकांनी त्यांना मागील निवडणुकीत निवडून दिले त्यांच्या प्रश्नाकडे त्यांनी सहा वर्षांत साफ दुर्लक्ष केले. मी माझी ओळख माझ्या कामाने निर्माण करीन असे नजीब मुल्ला यांनी उपस्थितांना आश्वासित केले.प्रसंगी व्यासपीठावर आ. संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शेखर निकम, राजाभाऊ लिमये, उमेश शेट्ये, कुमार शेट्ये, बशीर मुर्तजा, सुदेश मयेकर, बाप्पा सावंत, नसिमा डोंगरकर, सुधाकर सावंत, बाबु पाटील, नाना मयेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती