पीडित महिला गेवराई तालुक्यातील आहे. ती पुण्यातून पाटोद्यात आली असून पोलीस कर्मचाऱ्याने तिला फोनवर कार्यक्रमासाठी ये असे सांगून बोलावून घेतले.तिला दुचाकीवर बसवून एका घरात नेण्यात आले तिथे गेल्यावर पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरु केले. तिने आरडाओरड केल्यावर त्याने तिला चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. तिने पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानेच केलेले हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी.
नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षकांना कडक सूचना दिल्या आहेत. पीडितेच्या तक्रारीची दखल घेत, वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करावी आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी सांगितले.
पीडितेला त्वरित न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती मदत आणि सुरक्षा देण्याचे निर्देश देताना, त्यांनी सांगितले की अशा घटनांसाठी संपूर्ण पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करावी.