B.Ed. अभ्यासक्रम होणार बंद, त्याऐवजी लागू होणार ४ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम
मंगळवार, 9 जानेवारी 2024 (10:19 IST)
देशभरात सुरू असलेला दोन वर्षांचा विशेष बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024-2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे.
देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष बीएड अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमांना आरसीआयकडून मान्यता देण्यात येते. आरसीआयने आपल्या परिपत्रकामध्ये संपूर्ण देशातील सुमारे 1000 संस्था आणि विद्यापीठे यांच्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे असे स्पष्ट केलेय.
रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाचे सचिव विकास त्रिवेदी यांनी हे परिपत्रकात जारी केले आहे. या परिपत्रकात NCTE ने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम मध्ये चार वर्षांच्या B.Ed कार्यक्रमाची तरतूद केली आहे.
त्यामुळे आरसीआयनेही केवळ चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून आरसीआयकडून केवळ चार वर्षांच्या बीएड (विशेष शिक्षण) अभ्यासक्रमालाच मान्यता मिळणार आहे, असे म्हटले आहे.