आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’परिषद संपुर्ण राज्यभर होणार

गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (21:29 IST)
राज्याला खरा इतिहास सांगण्यासाठी ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’परिषदा संपुर्ण राज्यभर घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
 
पुण्यात शुक्रवारी  ही पहिली परिषद होणार असून हे अराजकीय व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धीरेंद्र गर्ग याने तुकाराम महाराजांचा अपमान केला असून तो चप्पल खाण्याच्या लायकीचा आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी उपहासात्मक बोलून त्यांचा अपमान करायचा आणि महापुरुषांचा इतर कुणाशी तरी तुलना करायची, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई- जोतिराव फुले यांच्यासह अनेक महापुरुषांचा गौरवान्वित इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राला खरा इतिहास सांगण्याची गरज असून त्यासाठी ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषदा संपूर्ण राज्यभर घेण्यात येणार आहेत.
 
शुक्रवारी या परिषदेचा प्रारंभ पुण्यातून होणार आहे. या परिषदांमध्ये आपल्यासह शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक सुषमा अंधारे, अ‍ॅड. वैशाली डोळस आणि शाहीर संभाजी भगत हे सहभागी होणार आहेत. 3 फेब्रुवारी रोजी पुणे येथील टिळक स्माक परिसरात ही परिषद होणार आहे. तसेच पुणे नंतर होणार्‍या इतर परिषदांमध्ये अमोल मिटकरी हे सुद्धा परिषदेत सामील होणार आहेत, असेही आव्हाड म्हणाले.
 
राज्याची संत परंपरा पुढे समाजसुधारकांच्या हाती गेली आणि त्याचा टप्पा म्हणजेच फुले दाम्पत्य. त्यामुळेच भिडे वाड्यात नतमस्तक होऊन त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन या परिषदेत सामील होणार आहे. पुरोगामी नेते नास्तिक असतात, असे सातत्याने बोलले जाते. पण, ते सत्य नाही. त्यामुळेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहे, असेही ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती