बालकांच्या पोषण आहारात सापडला मेलेला उंदीर

बुधवार, 29 डिसेंबर 2021 (19:07 IST)
बालविकास प्रकल्प विभागाच्यावतीने अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या वाळूमध्ये समोर आला आहे. या प्रकारामुळे पालकवर्गात संतप्त भावना व्यक्त होत असून, या घटनेचा अंगणवाडी पर्यवेक्षकांनी पंचनामा केला.
 
मंगळवारी वाळूजच्या अंगणवाडी क्रमांक १ मध्ये लाभार्थींना पोषण आहाराची पाकिटे वाटप करण्यात आली होती. या वेळी अंगणवाडी कार्यकर्त्या विद्या जोशी यांनी आराध्या अहिरे हिच्या पालकाकडे पोषण आहाराची पाकिटे दिली. आराध्याचे पालक शेजारीच राहणाऱ्या भाचा गौरव माळी व रूपाली माळी या दोघांचीसुद्धा पोषण आहाराची पाकिटे सोबत घेऊन गेले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पालकांनी पाकीट उघडून पाहताच त्यांना धक्का बसला, कारण गव्हाच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर आढळून आला.
 
गव्हाच्या पाकिटात मेलेला उंदीर आढळून येताच, पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर घटनेनंतर परीसरातील पालकांनी अंगणवाडीत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पालकांच्या तक्रारीनंतर अंगणवाडी पर्यवेक्षकांनी पंचनामा करत अहवाल संबंधित प्रशासनाकडे पाठवला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती