कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला

बुधवार, 29 डिसेंबर 2021 (15:39 IST)
कोल्हापूरमधील (Kolhapur) राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) दरवाजांचे तांत्रिक काम सुरू असताना एक दरवाजा उघडून अडकल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग (Water Disacharge) सुरू झाला आहे. परिणामी नदी काठावरील गावांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरला पाणी पुरवठा करणारे धरण म्हणून राधानगरी धरणाची ओळख आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी (Water Supply) व वीज निर्मितीसाठी (Power generation) होतो. दरम्यान आज सकाळच्या सुमारास सर्व्हिस गेट (Service Gate) चे काम सुरू असताना धरणाचा दरवाजा अडकला. त्यानंतर धरणातून हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
दरम्यान, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने पंचगंगा नदीमधील (Panchaganga River) पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Alert warning) देण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांनी नदी परिसरात जाऊ नये, घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साडे आठच्या सुमारास राधानगरी धरणामधील सर्व्हिस गेटचे काम सुरू होते. त्यावेळी एक दरवाजा खाली घेण्याचे काम सुरू असताना ही तांत्रिक समस्या (Technical Issue) निर्माण होऊन दरवाजा अडकला. त्यामुळे धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे पंचगंगा नदीपात्राशेजारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दुरुस्तीचे काम हे युद्धपातळीवर सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती