औरंगाबाद ऑनर किलिंग : खोट्या प्रतिष्ठेपायी आई-भावानेच केली दोन महिने गर्भवती तरुणीची हत्या

सोमवार, 6 डिसेंबर 2021 (16:00 IST)
ऑनर किलींगच्या एका घटनेनं महाराष्ट्र सध्या हादरला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील गोयेगावमध्ये खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावानेच तरुणीचं शीर धडावेगळं करत तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
सोमवारी घडलेल्या या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ पसरली आहे. आई-वडील आणि कुटुंबीयांच्या विरोधात जात या तरुणीनं प्रियकराबरोबर पळून जात विवाह केला होता. त्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे.
त्यातही आणखी धक्कादायक बाब म्हणजे हत्या करण्यात आलेली तरुणी ही दोन महिन्यांची गर्भवती होती. याबाबत कल्पना असतानाही कशाचाही विचार न करता तिची अत्यंत निर्घृणप्रकारे हत्या करण्यात आली.
या प्रकारानंतर आई व मुलानं पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांसमोर समर्पण केलं. पोलिसांनी त्यांना ऑनर किलिंगच्या प्रकरणात अटक केली आहे.
पोलिसांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.
तरुण-तरुणी एकाच गावातील
मृत कीर्ती उर्फ किशोरी मोटे ही तरुणी आणि अविनाश थोरे हे दोघंही गोयगाव येथीलच होते. अंदाजे अवघी 500 लोकसंख्या असलेलं हे गाव. अविनाश हा गावापासून अंदाजे 2-3 किलोमीटर अंतरावरच्या लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर राहत होता.
 
किशोरी आणि अविनाश हे शिकायला एकाच महाविद्यालयात होते. महाविद्यालयात असताना या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. मात्र किशोरीच्या कुटुंबीयांचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता.
या नात्याला विरोध असण्यामागचं प्रमुख कारण हे सामाजिक प्रतिष्ठा किंवा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये असलेली तफावत हे होतं, असं स्थानिक पत्रकार प्रशांत त्रिभुवन यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
यामुळंच कुटुंबीयांना या दोघांच्या नात्याला विरोध केला. मात्र अविशा आणि किशोरी यांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं, त्यामुळं कुटुंबाच्या विरोध मोडून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
 
पळून जाऊन केले लग्न
मोटे कुटुंबाच्या विरोधानंतरही किशोरी आणि अविनाश यांनी त्यांच्या नात्याला पुढे नेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं सहा महिन्यांपूर्वी हे दोघं घरातून पळून गेले होते.
जून महिन्यात पळून गेल्यानंतर त्या दोघांनी आळंदी याठिकाणी लग्न केलं आणि लग्नानंतर अविनाश थोरे त्याची पत्नी बनलेल्या किशोरीला घेऊन घरी आला.
तेव्हापासून सासरी म्हणजे लाडगाव येथील वस्तीवर असलेल्या घरामध्येच किशोरी राहत होती. मधल्या काळात माहेरच्या कुटुंबीयांबरोबर तिचा फारसा संपर्कही नव्हता.
मात्र सोमवारी घटना घडली त्याच्या आठ दिवसांपूर्वी मृत किशोरी यांच्या आई शोभा मोटे या त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मुलीला भेटून चहा-पाणी घेऊन त्या गेल्या होत्या.
 
निर्घृणपणे केली हत्या
आईने मुलीची भेट घेतल्यानंतर अंदाजे आठवडाभरानं म्हणजे सोमवारी 5 डिसेंबर 2021 रोजी मुलीची आई शोभा आणि भाऊ म्हणजे संजय मोटे हे दोघं पुन्हा एकदा लाडगाव शिवारातील तिच्या सासरच्या घरी तिला भेटण्यासाठी आले.
त्यावेळी किशोरी या शेतामध्ये निंदणीचं काम करत होत्या. आई आणि भाऊ आलेला पाहून काम सोडून आनंदानं त्या पळत आल्या आणि त्यांना भेटल्या.
त्यांना पाणी वगैरे देऊन किशोरी चहा करत होत्या, त्याचवेळी शोभा आणि संजय म्हणजे आई आणि भावानं त्यांची निर्घृणपणे हत्या केली.
धारदार शस्त्रानं संजय मोटे यांनी किशोरी यांच्या गळ्यावर सपासप वार केले आणि त्यांचं शीर धडापासून वेगळं केलं. या संपूर्ण प्रकारादरम्यान आई शोभा मोटे यांनी किशोरीचे पाय धरून ठेवले होते, असं पोलिसांनी प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.
धडावेगळं केलेलं शीर संजय मोटे यांनी बाहेर आणून त्याठिकाणी असलेल्या लोकांना दाखवलं आणि त्यानंतर ते शीर अंगणामध्ये ठेवून ते त्याठिकाणाहून निघून गेले.
 
दोन महिन्यांची गर्भवती
शीर अंगणात ठेवल्यानंतर संजय आणि शोभा हे दोघं काही अंतरावर असलेल्या बाईकवरून त्याठिकाणाहून निघून गेले. ते दोघं स्वतः पोलिस ठाण्यात गेले अशीही माहिती मिळाली आहे.
मृत किशोरी या दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांच्या आई शोभा मोटे यांना याबाबत माहितीही होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र हे माहिती असूनही तरीही कशाचाही विचार न करता अत्यंत निर्घृणपणे या दोघांनी त्यांची हत्या केली.
आईचाही या घटनेत समावेश असल्यानंही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचं सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा यांनी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.
"या घटनेत आपल्या मुलाचा सहभाग आहे, वंशाचा दिवा आहे त्यामुळं इच्छा असो वा नसो मुलाबरोबर जाणं ही आईची अपरिहार्यता असू शकते," असं याबाबचं त्यांचं वैयक्तिक विश्लेषण असल्याचं त्या म्हणाल्या.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
खोट्या सामाजिक प्रतिष्ठेच्या बळी महिलाच
आपल्या समाजात सामाजिक प्रतिष्ठा ही अनेक मुद्द्यांवरून ठरवली जाते आणि ही सामाजिक प्रतिष्ठा महिलांवर लादली जाते, त्यातून असे प्रकार घडत असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा म्हणाल्या.
"आपल्याकडे असलेल्या पुरुष प्रधान व्यवस्थेमुळं अशा प्रकरणांमध्ये काय महिलाच या खोट्या प्रतिष्ठेच्या बळी पडत असतात आणि अशा घटना घडतात," असंही त्या म्हणाल्या.
या सर्वाची सुरुवात कुटुंबापासून होत असते. कुटुंबामध्ये पुरुष हा प्रमुख असतो आणि त्यातून महिलांना दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो. शिवाय सामाजिक प्रतिष्ठा जपण्याचं सगळं ओझं हे महिलांवर टाकलं जातं, असंही त्या म्हणाल्या.
संविधानानं स्त्रीपुरुष समानता बहाल केलेली आहे. त्याची प्रत्येक घरात योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली तरच हा प्रकार थांबवता येऊ शकतो. तोपर्यंत असे बळी जातच राहतील, असंही मंगल खिवंसरा याबाबत बोलताना म्हणाल्या.
दरम्यान, या घटनेतील दोन्ही कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती