सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला, असा खळबळजनक दावा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेना-भाजपच्या होऊ घातलेल्या युतीबद्दल प्रश्न विचारला. यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेनेवर दबाव टाकण्यात आला. मात्र, शिवसेना या दबावाला जुमानत नसल्यामुळे भाजपकडून उद्धव ठाकरे यांना ईडीच्या चौकशीची भीती घालण्यात आली, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.