मी नापास झालो म्हणून...; नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत

बुधवार, 8 जून 2022 (15:13 IST)
गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षीत असलेली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल. आज बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे.
 
निकाल जाहीर झाला की काही जण निराश होतात. त्यातून टोकाचा निर्णय घेतला जातो. परंतु, अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करुन कसा यश मिळवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. दहावी बारावीमध्ये नापास होऊनही आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारे अनेकजण आहेत. याची उदाहरणाही तुम्ही पाहू शकता. असेच मराठमोळे दिग्दर्शक, लेखक नागराज मंजुळे यांचं नाव सर्वांना माहिती आहे. नागराज मंजुळे  यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून त्यांची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. या मार्कशीटमध्ये दिसत आहे की, त्यांना फक्त 38 टक्के मिळालेले आहे. त्यांची ही फेसबुक पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.
 
मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो फार तर पुढच्या वर्गात गेलो असतो, असं नागराज म्हणाले. मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
दहावी, बारावी, MPSC, UPSC अथवा कुठलीही परीक्षा असो, ती अंतिम कधीच नसते. यश-अपयशात असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही, अशी पोस्ट मंजुळे यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती