झुंड : आमिर खान नागराज मंजुळेंचा सिनेमा पाहून म्हणाला, 'बच्चनसाहबने...
बुधवार, 2 मार्च 2022 (19:41 IST)
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला 'झुंड' सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. हा सिनेमा पाहून अभिनेता आमिर खानने नागराज मंजुळे आणि त्यांच्या सर्व चमूचे कौतुक केले आहे.
या चित्रपटात अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत आहेत, तर 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनीही या चित्रपटात काम केलं आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.
आमिर खान यांच्यासाठी या सिनेमाचे विशेष छोटेखानी प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर आमिर खान यांनी नागराज मंजुळे, सिनेमातील कलाकार आणि महत्त्वाचे म्हणजे अमिताभ बच्चन यांचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. त्याचा एक व्हीडिओ सध्या प्रसारित झाला आहे.
सिनेमा पाहिल्यावर आमिर खान आणि त्याच्या आजूबाजूचे प्रेक्षक भारावून गेल्याचे आणि भावनिक झाल्याचं दिसून येतं.
झुंड पाहिल्यावर आमिर खान म्हणाला, "माय गॉड...व्हॉट अ फिल्म... बेहतरीन फिल्म
मेरेको एहसास नही था... जो आपने इमोशन पकडा है वो अनबिलिवेबल है..... क्या फिल्म बन गयी है यार... फॅंटॅस्टिक, युनिक है... इसका एंड रिझल्ट है आप एक स्पिरिट लेके जाते हो..."
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना आमिर खान म्हणतो, "बच्चनसाबने क्या काम किया है.... उन्होने बहोत अच्छा काम किया अनेक फिल्मों मे... लेकिन धिस इज वन ऑफ हिज ग्रेटेस्ट फिल्म्स..."
'झुंड'चे भरपूर कौतुक केल्यानंतर आमिर खानने सिनेमातील कलाकारांची भेटही घेतली, तसंच सर्व कलाकारांबरोबर गप्पाही मारल्या. आपल्या मुलाचीही त्याने सर्वांशी ओळख करुन दिली.
विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट
'झुंड' ही एका निवृत्त क्रीडा शिक्षकाची कथा आहे, ज्यांची भूमिका अमिताभ यांनी साकारली आहे. हा शिक्षक झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध सॉकर खेळाडू बनवतो.
'स्लम सॉकर' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे.
निवृत्त झाल्यानंतर विजय बारसे यांना 18 लाख रुपये मिळाले. त्या पैशातून काही जमीन खरेदी केली. त्यानंतर त्यांनी तळागाळातल्या मुलांसाठी एक फुटबॉलची अॅकॅडमी बनवण्याची योजना आखली, असं सांगितलं जातं.
विजय बारसे नागपूरच्या एका कॉलेजात क्रीडा शिक्षक होते. वंचित मुलांना भर पावसात प्लास्टिकच्या बादलीचा वापर करून फुटबॉल खेळताना पाहिल्यानंतर स्लम सॉकर सुरू करण्याचा विचार मनात आल्याचं विजय यांनी सांगितलं आहे.
झुंड आहे तरी काय?
झुंडविषयी एका मुलाखतीत नागराज यांनी सांगितलं, "झुंड ही एक अशा समूहाची गोष्ट आहे, जो सहजासहजी मिळणाऱ्या संधींपासून दूर आहे.
"यशाच्या मार्गावर किंवा संधी जिथं मिळते त्या मार्गापासून लांब असणारा हा समूह आहे. स्वत:च बिघडलेला असा हा एक समूह आहे आणि त्याची ही गोष्ट आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चर्चेत
'झुंड'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 3 मिनिटांचा हा ट्रेलर आहे. या ट्रेलरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेली फ्रेम पाहायला मिळत आहे.
या फ्रेममध्ये बाबासाहेबांसोबत शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महात्मा फुलेही आहेत.
त्यामुळे या दृश्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. तसंच याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
झुंड चित्रपट मराठीत नाही केला कारण...
झुंड चित्रपटाच्या निमित्तानं नागराज मंजुळे आणि टीम यांच्या मुलाखती प्रसिद्ध होऊ लागल्या आहे.
एबीपी माझाच्या मुलाखतीत झुंड चित्रपट मराठीत का नाही केला, या प्रश्नाचं उत्तर देताना नागराज मंजुळे यांनी म्हटलं, "मग मी म्हणतो पुष्पा मराठीत का नाही केला किंवा तेलुगूत का पाहिला, हिंदीत का पाहिलात. मी फेसबुकवर पण पाहतो, सोशल मीडियावर काही सेन्सिबल गोष्टींवर चर्चा होत नाही.
"पण मला ही गंमत वाटते मराठीत केला पाहिजे. मग बच्चन साहेबांनी पण मराठीत केला पाहिजे ना. बच्चन साहेबांनी मराठी शिकून मराठी भाषेत चित्रपट करता येईल इतरा रुबाब मराठी भाषेचा आणि दिग्दर्शकाचा म्हणजे माझा पाहिजे. त्यासोबत तेवढा वेळ पाहिजे. निर्मात्यांनी तेवढे पैसे दिले पाहिजे की बच्चन साहेब मराठीत चित्रपट करतील."