छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करू दिले नाहीत. यासंदर्भातली एक इंस्टाग्राम पोस्ट संयोगीताराजे यांनी पोस्ट केली. या प्रकारानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी संबंधित महंतावर कारवाई करण्याची मागणी केली. महंतांना २४ तासाच्या आत अटक करा, अन्यथा बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही मिटकरींनी दिला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिटकरी म्हणाले, “नाशिक येथील काळाराम मंदिरात छत्रपती घराण्याच्या वारसदार संयोगीताराजे छत्रपती यांना वेदोक्त प्रकरणाचा अनुभव आला. १८९९ साली शाहू महाराजांनाही पंचगंगेच्या घाटावर कार्तिक मासाच्या वेळी अशा प्रसंगाचा अनुभव आला होता. त्यांना अपमानाचा प्रसंग सहन करावा लागला. काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना रामरक्षा स्तोत्र आणि वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं किंवा तुम्हाला तो अधिकार नाही, असं सांगितलं.”