अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा आता १५ लाख रुपये

शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (08:25 IST)
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखावरून १५ लाख करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही श्री.पाटील यांनी दिली.
 
श्री.पाटील म्हणाले की, महामंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच पहिल्या दिवशी राज्यातील ३ हजार ७२७ लाभार्थ्यांना २ कोटी ९७ लाख एवढा व्याज परतावा वितरीत केला आहे. महामंडळातर्फे व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मर्यादा १५ लाख रु. पर्यंत वाढविली आहे. त्याचबरोबर सीसी आणि ओडी कर्जांतर्गतचा व्याज परतावा पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
 
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जांना राज्य सरकारतर्फे हमी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या ही हमी पुन्हा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मराठा समाजातील तरुणांना मोठा फायदा होणार आहे. असेही श्री.पाटील यांनी नमूद केले.

महामंडळाच्या कर्ज योजनातून एक लाख मराठा उद्योजक तयार करू असे सांगून श्री.पाटील म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. सारथी आणि महाज्योती महामंडळांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक येथे मुलींचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती