अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे 'ही' केली मागणी

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (16:15 IST)
गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रवास कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणि त्यासारख्या नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आग्रही मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात अमित ठाकरे यांनी म्हटले आहे की, “मागील सहा महिन्यांच्या करोना लॉकडाउनच्या कालावधीत क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मागील सहा महिन्यात सर्वसामान्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबरच प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो. सध्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनाने प्रवास परवडत नाही. या खर्चामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांचा मृत्यू दर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक होत चालला आहे.” तसेच, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान आधारासाठी सोबत नातेवाईकाची गरज असते. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान खासगी वाहनाने प्रवास परवडणं शक्य नसल्याने त्यांना रेल्वेने प्रवासासाठी मुभा देणे गरजेचे आहे असे देखील म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती