महाराष्ट्रातील सर्व शाळा लवकरच सुरु होणार

शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (19:17 IST)
मुंबई –कोरोना महामारीच्या संकटामुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा केव्हा सुरु होणार, हा प्रश्न पालकांना पडला आहे. अशातच आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
राज्य सरकारांना कोरोनामुळे शाळांना लागलेली कुलूपे खोलण्याचा अधिकार आहे. कोरोनाचा धोका कमी झाला असल्यामुळे सध्या आठवी ते बारावीचे वर्ग राज्य सरकारने सुरु केले आहेत. उर्वरीत वर्ग देखील आता लवकरच सुरु होतील. पुढील आठवड्यात शिक्षण विभागाची यासंदर्भात एक बैठक आहे.
 
दरम्यान 15 जुलैपासून राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. यानंतर राज्यातील 5947 शाळा सुरु करण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
 
राज्यात एकूण 19,997 शाळा आहेत. त्यापैकी 5,947 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच 4,16,599 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी नोंदवली असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान, आता सर्व शाळा पूर्ण क्षमतेने केव्हा सुरु होणार?, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती