27 जुलै रोजी राज्यातील बहुतेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग समाविष्ट आहे
उत्तर छत्तीसगड आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पूर्व मध्य प्रदेश, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टी तसेच घाट भागात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
नागपूर आणि संपूर्ण पूर्व विदर्भात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे उपराजधानीच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात मेघा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि वर्ध्यातही सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी , शहरी भागात सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
नागपूर आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
आज नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर आणि पूर्व विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पावसाने भयानक रूप धारण केले आहे. येथील शिरजगाव शहर परिसरातून वाहणाऱ्या मेघा नदीला पूर आला आहे आणि नदी दोन टप्प्यात वाहत आहे. परिसरातील अनेक लहान-मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.