पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने कुटुंबातील राजकीय संघर्ष टोकदार झाला असून एकमेकांवर जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मी तोंड उघडलं तर तुम्हाला लोकांमध्ये फिरणं अवघड होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावंडांना दिल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना प्रति आव्हान दिलं आहे. धाडस करून तुम्ही नाव घेऊन आरोप करा, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना रोहित पवार म्हणाले की, "बारामती मतदारसंघात दडपशाही आणि दबाव असतानाही कार्यकर्ते आणि लोक आमच्यासोबत येत आहेत, यावरून तुम्ही कसा प्रतिसाद आहे, याचा अंदाज लावू शकता. अजितदादांच्या निवडणुकीत भावंडंही फिरली आहेत. अगदी बहिणींनीही अजितदादांचा प्रचार केला आहे, हे आपल्याला लोकंच सांगतील. कोणत्या भावंडांबाबत त्यांचा आक्षेप आहे, नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अजितदादांनी धाडस दाखवून नाव घेऊन सांगावं. त्यानंतर ती भावंडंच त्यांना उत्तर देतील," असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे.