शरद पवारांसोबत झालेल्या 'त्या' भेटींबाबत अजित पवारांचे गौप्यस्फोट आणि त्याचे राजकीय अर्थ

शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (18:58 IST)
'घड्याळ तेच वेळ नवी' हे ब्रीदवाक्य घेऊन कर्जतला जमलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने शरद पवारांवर गंभीर टीका करून आगामी राजकारणाच्या दिशेबाबत सूतोवाच केले आहे.
 
अजित पवार गटाचे सगळे प्रमुख नेते, राज्यातील पदाधिकारी, आमदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव नं घेता अनेक गौप्यस्फोट केले आहे.
 
चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटींबाबत राज्यभर चर्चा होत होत्या. या भेटींचे राजकीय अर्थ नेमके काय आहेत?
 
अजित पवार शरद पवारांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का? पुण्यातील उद्योजकाच्या घरी झालेल्या दोन्ही पवारांच्या भेटीतून काही निष्कर्ष निघेल का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा शरद पवारांना भेटायला का जात आहेत? असे प्रश्न विचारले जात होते.
 
मात्र कर्जतच्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले.
 
प्रत्येक वेळी आम्हाला भेटायला बोलवून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही का केला असे प्रश्न विचारले आणि यासोबतच जर राजीनामा मागेच घ्यायचा होता तर तो दिला कशाला? असाही सवाल अजित पवारांनी शरद पवारांना विचारलाय.
 
सुप्रिया सुळेंनी वेळ मागून घेतला होता
भाजप आणि शिवसेना सरकारमध्ये सामील होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या एका बैठकीचा दाखला देत अजित पवार म्हणाले की, “आम्हाला सातत्यानं गाफील ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही 10 ते 12 जण देवगिरीवर बैठकीसाठी बसलो होतो.
 
सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगितलं तर त्यांना काय वाटेल? असा विचार होता. म्हणून आम्ही सुप्रियाला तिथे बोलवून घेतलं.
 
तिला सांगितलं की सगळे जिवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो, तर संघटना पुढे जाते.
 
सगळं ऐकल्यानंतर तिनं सांगितलं की मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते. आम्ही 10 दिवस थांबलो. तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते."
 
सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर बोलताना असं सांगितलं की, "मला या बैठकीला बोलावण्यात आलेलं नव्हतं. मी माझ्या भावाचं घर आहे म्हणून त्या बैठकीत अचानक गेले.
 
सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मी त्यांना विनंती केली होती की मला सात दिवसांची मुदत द्या आणि मी बाबांना बोलून सांगते असं मी म्हणाले होते.
 
मी अनेक गोष्ट बाहेर बोलत नाही, माझ्या आईने मला ती शिकवण दिलेली नाही."
 
अजित पवारांनी विचारलं "ही नौटंकी कशाला?"
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सरकारमध्ये जाण्यासाठी हालचाली सुरु केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना मी 1 मे ला राजीनामा देतो आणि तुम्ही सरकारमध्ये जा असं सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.
 
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं आणि त्याचदिवशी ते राजीनामा देणार होते असं अजित पवार म्हणाले.
 
पण त्यानंतर झालेल्या घटनांबाबत बोलताना ते म्हणाले की, 1 मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही,
 
घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली.
 
"त्यानंतर त्यांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला व युवक पाहिजे.
 
त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही की का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे.
 
ठराविकच टाळकी होती तिथे. जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता तिथे. आम्हालाही कळेना. मला एक सांगतायत, तिथे एक सांगतायत."
 
आमचा निर्णय मान्य नव्हता तर वेळोवेळी बैठकांना का बोलावलं?
2 जुलैला अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर झालेल्या बैठकांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "2 जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर 15 दिवसांनी 17 जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलवलं?
 
आम्हाला सांगितलं की आधी मंत्री या. दुसऱ्या दिवशी आमदार या. काही आमदार घाबरत होते. मी आमदारांना घेऊन गेलो. सगळे बसले. चहापाणी झालं.
 
तिसऱ्या दिवशी शरद पवारांबरोबर राहिलेल्या लोकांबरोबर चर्चा होणार होती.
 
पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं, 'गाडी ट्रॅकवर आहे', असं आम्हाला काही जणांकडून सांगितलं जायचं. यात वेळ गेला.
 
तटकरे म्हणायचे आम्हाला लवकर सांगा, आम्हाला पुढे जायचंय. रुपाली चाकणकरांनी काही बोललं की सांगायचे की, 'तू तसं काही म्हणू नको' असं सांगितलं जायचं. सगळं पूर्ववत करण्याबाबतचे निरोप यायचे. तुम्ही आम्हाला गाफील ठेवायचे का?”
 
पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी झालेल्या अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीबाबतही अजित पवारांनी गौप्यस्फोट केला.
 
ते म्हणाले की, “12 ऑगस्टला मला एका उद्योगपतीकडे बोलवलं. त्यांनी मला सांगितलं की इथे वरीष्ठ(शरद पवार), जयंत पाटील, तुम्ही आणि मी एकत्र जेवायचं.
 
निरोप आल्यानंतर मी गेलो. आमच्या निर्णयानंतर जवळपास दीड महिना उलटला होता. जर करायचंच नव्हतं तर कशासाठी हे सगळं केलं?"
 
अजित पवारांचे आरोप हा सामान्य कार्यकर्त्यांना दिलेला संदेश
कर्जतच्या शिबिरात अजित पवारांनी शरद पवारांवर झाडलेल्या आरोपांच्या फैरींवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणाले, "शरद पवार आमचे दैवत ते शरद पवारच या सगळ्या गोष्टींना जबाबदार असा जो काही प्रवास अजित पवारांनी केला आहे त्याला प्रामुख्याने दोन गोष्टी कारणीभूत आहेत.
 
अजित पवार आणि त्यांच्या गटाला एक खात्री होती की शरद पवार शस्त्रं टाकून आमच्यासोबत पर्यायाने भाजपसोबत येतील आणि ते कुठेतरी माघार घेतील.
 
पण, ज्या पद्धतीने स्वतः शरद पवार निवडणूक आयोगाच्या सुनावणीला हजेरी लावतायत हे बघून असं दिसतं की पवारांनी त्यांची लढाई लढवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे हे दोन्ही गट एकत्र होण्याची शक्यता आता मावळलेली दिसत आहे. "
 
"वय आणि बाकीच्या इतरही गोष्टी विरोधात जात असताना शरद पवारांनी घेतलेला पवित्रा पाहता आता हे स्पष्ट आहे की दोन्ही गटांनी एकेमकांच्या विरोधात लढण्याचं ठरवलेलं आहे.
 
चिन्ह आणि पक्षावरील मालकीसाठी कायदेशीर लढाई होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे अजित पवारांना स्वतःला सिद्ध करणं, त्यांनी घेतलेल्या निर्णयाला योग्य ठरवणं गरजेचं आहे.
 
शरद पवारांनी 1978 मध्ये जनसंघासोबत जाण्याचा जो निर्णय घेतला होता तसाच माझाही निर्णय असल्याचं सांगून अजित पवारांनी मी देखील शरद पवारांसारखंच राजकारण करू शकतो हे त्यांच्या कार्यकर्त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या सामान्य मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला आहे."
 
सामान्य कार्यकर्त्यांना पटवून देण्यासाठी अजित पवार आक्रमक
अजित पवार गटाकडे आमदार आणि खासदारांचा पाठिंबा असला तरी राज्यातील राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता त्यांच्या निर्णयाशी किती सहमत आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
 
त्यामुळे याबाबत बोलताना सुधीर सूर्यवंशी म्हणाले की, "मध्यंतरी एका माध्यमसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की अजित पवारांना सामान्य मतदारांपैकी पाच टक्के मतं मिळतील असं सांगितलं होतं आणि शरद पवार गटाला सतरा टक्के मतदारांचा पाठिंबा आहे.
 
त्यामुळे मतदारांना मीच कसा खरा वारसदार हे पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
 
सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार आणि शरद पवार हे एकच आहेत अशी संदिग्धता अनेक मतदारांच्या मनात आहे आणि ती दूर व्हावी आणि आता या दोघांचे रस्ते वेगळे झाले आहेत असा स्पष्ट संदेश देण्यासाठीच अजित पवारांनी कर्जतच्या सभेत ही भूमिका घेतल्याचं दिसतं."
 
बापाची चप्पल पायात घातली म्हणून बाप होता येत नाही
अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "शरद पवारांवर बोलण्याएवढे अजित पवार मोठे नाहीत. मी आंदोलन करण्यासाठी शरद पवारांचीही परवानगी मागत नाही. आंदोलन करायला हिंमत लागते.शरद पवार बोळ्याने दूध पfत नाहीत, शरद पवारांना घाबरवू नका. तुमचं बालिश राजकारण बस्स करा. बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही. बाप व्हायला अक्कल लागते. जे ऐश्वर्य पाहिलं ते कुणामुळे? याचं भान ठेवून बोलावं."
 
Published By- Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती