अजित पवार नाराज?

बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (08:11 IST)
Ajit Pawar upset राज्यात ट्रिपल इंजिन सरकार मजबूत असल्याचा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे. परंतु विविध मुद्यांवरून अंतर्गत धुसफूस वाढताना दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्रिपदाची निवड मागच्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. तसेच महामंडळ वाटप, १२ आमदारांची नेमणूक यासह अन्य मुद्देही अधांतरीच राहात आहेत. यावरून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढला असून, हे दोन्ही नेते तात्काळ दिल्लीला रवाना झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील राजकीय स्थिती आणि मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्रिपदावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीअंतर्गत इतर रखडलेल्या मुद्यावरही मार्ग काढण्याच्या दृष्टीने चर्चा होणार असल्याचे समजते. या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
महायुतीत सामिल झाल्यानंतर अजित पवार गटाला वजनदार खाते दिले. त्यामुळे तिन्ही पक्षांचे सरकार मजबुतीने वाटचाल करेल, असा विश्वास सुरुवातीपासून व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार मंत्रिपदाचा फॉर्म्यूला, पालकमंत्रिपद देण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अजित पवार गट सत्तेत आल्यापासून वाटाघाटीची फक्त चर्चाच झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती