पिंपरी चिंचवड : देशात पेट्रोल डिझेल महाग झालं, महागाई वाढली, श्रीलंकेत लोकांनी लोकप्रतिनिधींना मारलं. पाकिस्तानात वातावरण खराब झालंय. भारताला हे सर्व परवडणारं नाही. कोणीही उठतं अन् काहीही बोलतं. काहींना वाटतं आमदार केलं म्हणजे फार मोठं काही तरी झालं. त्यांचं डिपॉजीट बारामतीकरांनी जप्त केलं. मात्र हे आपले संस्कार आहेत का? असं म्हणत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना टोला लगावला.
तसंच मारोतीरायाचा जन्म कुठे झाला यावर वाद करतोय. यातून काय मिळणार आहे. हनुमान चालिसा म्हणायला कुणासमोर जाण्याची गरज आहे का? यातून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. जातीय तेढ, तणाव निर्माण केला जातोय. अठरापगड जातींना आणि बाराबलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण झालं हे आपण विसरता कामा नये असं अजित पवार म्हणाले. आपल्यासमोर आज लोकशाही टीकवण्याचं आवाहन आहे. देशाच्या एकतेला अखंडतेला धक्का देणाऱ्यांना ओळखलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले. पवार साहेबांच्या घरावर हल्ला केला, त्याचं कारण काय होतं? काय साध्य झालं? पवार साहेब सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा देखील अजित पवारांनी समाचार घेतला. ते म्हणाले भाजपमध्ये अशी परिस्थिती नव्हती. मात्र आता भाजपची विचारसरणी बदलली आहे.