मास्क न घालणाऱ्या मंत्री, आमदारांवर अजित पवारांचा संताप; सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी

गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (21:40 IST)
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमु्ख्यमंत्री अजित पवार सभागृहातील सदस्यांवर चांगलचे संतापलेले दिसले. अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणी देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. एखाद्या सदस्याला बोलताना त्रास होत असेल तर आपलं बोलून झाल्यानंतर पुन्हा मास्कचा वापर करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली.
 
परदेशात दीड दिवसाला दुप्पट रुग्णसंख्या वाढतेय इतकी भीषण स्थिती आहे. ज्या त्या वेळेत कोरोनाचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. मास्क न लावणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढा. मास्क घातला नाही तर कितीही कोणी प्रयत्न केला तर हे नियंत्रणात येणार नाही. आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर व्हायरल होतात. ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा असं अजित पवार यांनी सांगितले.
 
अधिवेशन सुरु झाल्यापासून आज दुसरा दिवस आहे. आपण प्रत्येकजण ३-४ लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात बसतो. देशाचे पंतप्रधानदेखील कोरोना संकटावर गांभीर्याने विचार करत आहेत. सध्या कोरोनाचं संकट आहे त्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करत आहे. देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती