राज्यसभेच्या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यातील सहा जागा या महाराष्ट्रातील आहेत. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे या फुटीचा फायदा कोणाला होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई संघटन मजबुतीसाठी अल्पसंख्याक चेहरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने या निवडणुकीत अल्पसंख्याक चेहरा देण्याचे निश्चित मानले जात आहे. अजित पवारांची मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत नसल्याची खंत आहे. एकिकृत राष्ट्रवादी असल्यापासूनची त्यांची ही तक्रार आहे. समीर भुजबळ यांच्यासाथीला अल्पसंख्याक चेहरा दिल्यास मुंबईत राष्ट्रवादीसाठी अनुकूल वातावरण राहील अशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ गोटात चर्चा सुरु आहे.
काँग्रसमधून राष्ट्रवादीत येऊ इच्छिणारे बाबा सिद्दीकी यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेचे तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारही गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. लोकसभेतील पराभव पार्थ यांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे संसदेत जाण्याची ही संधी सोडायला पार्थ तयार नाहीत.