नाशिकपेक्षा हैदराबादमध्ये कांद्याला भाव जास्त कसा? अजित पवारांचा सवाल

शनिवार, 17 जून 2023 (08:45 IST)
जळगाव :कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. कांद्याला नाशिक आणि पुणे बाजारपेठेत भाव मिळत नाही. महाराष्ट्रात कांदा पिकवणारे राज्याबाहेर कांदा पाठवत आहेत. नाशिकला मिळणाऱ्या भावापेक्षा हैदराबादला कांद्याला पाच-सहा पट अधिक भाव कसा मिळतो? तेथे जास्त भाव मिळत असेल तर आपल्या सरकारने पणन महासंघाने यात हस्तक्षेप करायला हवा. याबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमळनेर येथे पत्रकार परिषदेत केली.
 
राज्यात खतांच्या बियाणांच्या किमती वाढवल्या जात आहेत. बोगस खते, बियाणे विकली जात आहेत. हे रोखण्यासाठी छापे मारले जातात. मात्र छापे मारण्यासाठी जो ग्रुप जातो त्यात मंत्र्यांचा पी.ए. दिसतो. हा कशासाठी असतो? आज राज्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारी बदल्यांचे दर ठरलेले आहेत. असे पूर्वी कधी घडले नाही. एक वर्ष या सरकारला होत आले. वर्षात किती गुंतवणूक आली, किती कारखाने राज्यात आलेत कळले पाहिजे. आज महाराष्ट्राची अवस्था ही अत्यंत केविलवाणी झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. केवळ 20 मंत्र्यांवर कारभार सुरू आहे. एकेका मंत्र्याकडे तीन ते पाच खाती आहेत. त्यामुळे खात्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे विकासाचा विचार करतांना जिल्ह्यांना न्याय हा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती