अजित पवार विधानभवनात दाखल, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग

मंगळवार, 18 एप्रिल 2023 (13:05 IST)
अजित पवार पुन्हा एकदा 'राष्ट्रवादी'मधला आपला एक गट घेऊन भाजपाच्या सोबत जाणार असल्याची शक्यता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. तिला 'राष्ट्रवादी' अथवा पवार यांच्याकडून स्पष्ट शब्दांत आणि विस्तारानं नाकारलं न गेल्यानं ती शक्यता अधिक दाट बनली आहे.
 
अजित पवार यांनी सोमवारी संध्याकाळी ट्वीट करत म्हटले की "मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.
 
"सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे," असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
 
अजित पवार विधानभवनात दाखल
अजित पवार आता (18 एप्रिल / सकाळी 11 वाजता) महाराष्ट्राच्या विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ते तिथे काही नियोजित गाठीभेटी घेणार आहेत.
 
आजे ते विधानभवनात असतील, हे अजित पवारांनी कालच ट्वीट करून सांगितलं होतं. त्यानुसार ते विधानभवनात पोहोचले आहेत.
 
शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी चर्चा फेटाळल्या
अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावली नाही, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिली.
 
"तुमच्या मनातील चर्चा आमच्या मनात नाहीत. त्यामुळे या चर्चांना अजिबात अर्थ नाही," असंही शरद पवार म्हणाले.
 
तर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राष्ट्रवादीचे आमदार काही बोलले असतील तर व्हीडिओ पाठवा, मग मी माझी प्रतिक्रिया देईन."
 
महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत या सर्व घडामोडींच्या निमित्तानं म्हणाले की, "अजित दादा हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित दादा यांच्याविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होताहेत त्या माझ्या माहितीप्रमाणे खोट्या आहेत."
 
"यामुळे वेगवेगळ्या अफवांना उत आला असून त्यामुळे मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र याचा महाविकास आघाडीच्या युतीवर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी बोलून ही माहिती घेतली," असंही ते पुढे म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसची इफ्तार पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला अजित पवार हेही उपस्थित राहणार असल्याचं पत्रकावरून दिसतं आहे. पण प्रत्यक्षात अजित पवार इथे उपस्थित राहतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
भाजपच्या प्रमुख नेत्यांची दुपारी बैठक
महाराष्ट्र भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अत्यंत महत्त्व आलंय.
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती