समीर वानखेडेवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले…

मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:09 IST)
आर्यन खान अटक प्रकरणानंतर अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे  यांच्यावर दररोज अनेक आरोप करत आहेत. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाटील यांच्या विधानानंतर राज्यात चर्चा रंगल्या आहेत. त्यावेळी जयंत पाटील हे ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.
 
जयंत पाटील  म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने  टाकलेले अनेक छापे आणि समीर वानखेडे यांच्याबद्दल नवाब मलिक यांनी पुराव्यासह काही गोष्टी समोर आणल्या आहेत. हे एकंदर प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील, असे संकेत जयंत पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांच्या या विधानावरुन या प्रकरणात आता राज्य सरकार  लक्ष घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढे ते म्हणाले, प्रभाकर साईल  यानं एनसीबी व समीर वानखेडे यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील चित्रपट उद्योगाला आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. ED, CBI, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टिव्ह झालेली दिसते. एनसीबीच्या धाडींमध्ये भाजपचे कार्यकर्तेच संशयितांना पकडताना दिसत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती