बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना ट्वीट डिलिट करण्याची नामुश्की ओढावली

गुरूवार, 5 जानेवारी 2023 (21:29 IST)
राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही फायरब्रॅण्ड नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड भाजपाच्या निशाण्यावर आहेत. त्यातच, जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्या फोटोवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना ट्वीट डिलिट करण्याची नामुश्की ओढावली. आता यावरही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. खोटे बोलून कसे खेळ करता येतात हेच दाखवायचे होते, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या डिलीट केलले्या ट्वीटबाबत सारवासारव केली आहे.
 
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. चंद्रशेखर बावनकुळे औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहत आहेत, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी याद्वारे केला. या फोटोमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर नेते व मुस्लीम धर्मगुरू दिसत आहेत. हा फोटो ट्वीट करताच भाजपाच्या गटात खळबळ माजली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका होऊ लागली. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लागलीच या फोटोबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती