नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली साठी प्रवेश प्रक्रिया सुरू : विकास मिना

शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (08:22 IST)
aadivasi vikas english
आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रात पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, येवला, निफाड, इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता 1 ली मध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छूक पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक विकास मिना (भा.प्र.से)  यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. पालकांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने अनुसूचित जमातीचा दाखला दिलेला असावा. जर विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असेल, तर त्या संदर्भात यादीतील अनुक्रमांक नमूद करावा व सोबत दाखल्याची सत्यप्रत जोडावी.  विद्यार्थ्याच्या पालकाच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रूपये 1 लाख इतकी असून सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत सोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे 31 डिसेंबर 2022 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे व त्याचा जन्म 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 च्या दरम्यान झालेला असावा. प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड आवश्यक आहे. अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व 2 पासपोर्ट साईजचे फोटो जोडण्यात यावे. विद्यार्थ्याचे पालक शासकीय नोकरीदार नसावेत.  विद्यार्थी अनाथ, अपंग, महिला पालक, घटस्फोटीत, निराधार परितक्त्या असल्यास सोबत तसा दाखला जोडण्यात यावा. उपलब्ध जागेनुसार  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा बदलता येणार नाही. त्याबाबतचे  पालकाचे हमी पत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.पालकांनी खोटी माहिती दिल्याचे तपासणीत आढळून आल्यास प्रवेश रद्द करून
 
फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.अशा प्रवेशच्या अटी व शर्ती प्रसिध्दी पत्रकात नमूद आहेत.
 
प्रवेशासाठी अर्ज हे 1 फेब्रुवारी 2022 पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, आदिवासी विकास भवन, जुना आग्रा रोड, गडकरी चौक नाशिक येथे पाल्याचा जन्म दाखला व पालकांचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर विनामुल्य उपलब्ध होतील. भरलेले अर्ज दिनांक 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत  प्रकल्प कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्यांचे व इतर प्रकल्प कार्यालयाच्या क्षेत्रातील फॉर्म त्या त्या संबंधिंत कार्यालयात स्विकारले जातील.
 
पेठ, सिन्नर, इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यातील पात्र अर्ज असणाऱ्या पालकांनी व पाल्यांनी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 03 मार्च 2022 रोजी तर त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, येवला व निफाड तालुक्यातील   पात्र अर्ज असणाऱ्या पालकांनी व पाल्यांनी 04 मार्च 2022 रोजी एकलव्य पब्लिक स्कूल पेठ रोड नाशिक येथे स्वखर्चाने सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे. यासाठी कोणाताही  प्रवासखर्च अनुज्ञेय रहाणार नाही. मंजूर लक्षांकापेक्षा अर्ज जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यासा विद्यार्थ्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येईल असेही, सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक विकास मिना (भा.प्र.से) यांनी कळविले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती