आदित्य ठाकरे महिना अखेरीस कोल्हापूर दौऱ्यावर

शनिवार, 23 जुलै 2022 (08:40 IST)
कोल्हापूर शिवसेनेतील बंड आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर माजी पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (MLA  Aditya Thackeray) या महिन्याच्या अखेरीस कोल्हापूर दौऱयावर येणार आहेत. 27 ते 30 जुलै दरम्यान, ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा निश्चित करण्याच्या दृष्टीने स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. कोल्हापूर दौऱ्यात आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरकरांशी संवाद साधणार असून शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
 
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून राज्यात सत्तांतर घडवून आणले. या राजकीय घडामोडी आणि नाट्य़ाचा कोल्हापूरच्या शिवसेनेवरही परिणाम झाला. आमदार प्रकाश आबीटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

त्यांच्या पाठोपाठ प्रा. संजय मंडलिक, धैर्यशिल माने हे दोन्ही खासदार शिंदे गटात सामिल झाले. कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेतून आऊट गोईंग झाल्यानंतर आता प्रथमच आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांची निष्ठा सभा होणार असून या सभेच्या माध्यमातून ते कोल्हापूरच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱयांशी संवाद साधणार आहेत. जुन्या जाणत्या शिवसैनिकांशीही चर्चा करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती