उद्धव यांच्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू; नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी

मंगळवार, 10 मे 2022 (21:20 IST)
मी लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच त्यांचे सुपुत्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. ठाणे आणि शहापूरमधील दुर्गम भागाचा दौरा केल्यानंतर आदित्य हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. दिवसभरात त्यांनी येथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
 
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे आव्हान परतवून लावण्यासाठी राज्यातील आरोग्याच्या सेवा-सुविधा भक्कम करणे आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे यावर आपल्या महाविकास आघाडी सरकारने भर दिला. हे करत असताना सर्वसामान्यांच्या हिताचे जे वचन आम्ही दिले त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. नांदेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे हे भूमिपूजन त्याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
 
वाडी (बु.) येथे नांदेड उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार हेमंत पाटील, खासदार संजय जाधव, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, महापौर जयश्री पावडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, वाडी बु. सरपंच अश्विनी रमेश लोखंडे, दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, उपसरपंच साधनाताई पावडे, गोविंदराव नागेलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
राज्याच्या सामान्यातील सामान्य जनतेशी बांधिलकी ठेऊन आम्ही विकास कामांकडे व्यापक दृष्टिकोणातून पाहत आहोत. आव्हाने अनेक आहेत. नैसर्गिक आव्हानांची यात भर पडत चालली आहे. पाण्याचे दुर्भीक्ष, वातावरणातील बदल, वाढती उष्णता हे प्रश्न डोळ्यापुढे ठेऊन भविष्यातील महाराष्ट्राचे नियोजन करावे लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक विभागाला एक समर्थ नेतृत्व लाभलेले आहे. आपल्या अनुभवाच्या, कौशल्याच्या बळावर राज्याच्या विकासाचा मार्ग आम्ही अधिक भक्कम करू, असा विश्वास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
 
या राज्यातील शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी शासनाने कोणतीही कमतरता ठेवली नाही. आपल्या बळीराजाला कर्ज मुक्त करण्याचे आम्ही वचन दिले होते. कोरोना सारख्या आव्हानातही आम्ही ते पाळले. राज्यातील सर्वांच्या स्वाभिमानाशी निगडीत असलेले भव्य शिवस्मारक हे आमचे स्वप्न आहे. यासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची तरतूद आपण केलेली आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी लक्षात घेता त्यादृष्टिने आम्ही प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेचा त्यांनी आवर्जून उल्लेख करत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे कौतुक केले.
 
नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने परिपूर्ण वैद्यकीय सेवा-सुविधा असाव्यात यावर आरोग्य विभागानेही लक्ष दिले आहे. उपजिल्हा रुग्णालयाची मागणी ही जिल्ह्यासाठी आवश्यक असून आता या नवीन रुग्णालयामार्फत अधिकाधिक लोकांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, त्यांच्यावर उपचार करता येतील. ग्रामीण भागाच्यादृष्टिने हे उपजिल्हा रुग्णालय महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. व्हिडिओ कॉन्फरसिंन्सगद्वारे त्यांनी या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
 
सवंग लोकप्रियतेपेक्षा सर्वसामान्य जनतेला ज्या सुविधा गरजेच्या आहेत, ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या जाणून घेऊन, त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी विचारविमर्ष करून त्या योजनांसाठी झटणारा हा आमचा नेता-कार्यकर्ता आहे, या शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांचे कौतूक केले. फार आवश्यकता जर कुठे असेल तरच आक्रमकपणा व ऐरवी सदैव संयमीपणा ठेवल्याने कल्याणकरांची उपजिल्हा रुग्णालयाची मागणी शासनाने मान्य करण्यात कोणती कसूर ठेवली नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आमदार कल्याणकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रास्ताविक केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती