वंचित आघाडीने आमच्यासोबत यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यामुळे त्यांनी चुकीची भूमिका घेऊ नये," असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. येणारी निवडणूक लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाची असून, त्यात परिवर्तन झाले नाही, तर देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
कृपाशंकर सिंह, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपने केली होती. मात्र, आजची परिस्थिती काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना तुरुंगात टाकायची भाषा केली जात होती त्यांना भाजपमध्ये तिकीट दिले जाते, ही भाजपची गॅरंटी असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. यानंतर भाजपला राज्यात बहुमत मिळाले तरी त्यात सगळा भरणा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटिरांचा असेल. भाजपचे स्वत:चे त्यात काय असेल, असा प्रश्नही त्यांनी केला.