3 लाख रूपयांची लाच घेताना पोलिस अधिकार्‍यावर कारवाई

शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (08:10 IST)
आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच यापुढे बेटिंगचा धंदा सुरळीत चालु ठेवण्यासाठी 4 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून 3 लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  एका पोलिस उपनिरीक्षकासह दोघांवर कारवाई केली आहे. 3 लाख रूपयांची लाच घेताना पोलिस अधिकार्‍यावर कारवाई झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
पोलिस उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे (स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) आणि संजय आझाद खराटे यांच्यावर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आयपीएल क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरू असल्याबाबत पोलिस उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे यांना माहिती मिळाली होती. फ्लॅटवर सुरू असलेल्या उद्योगाविरूध्द गुन्हा दाखल न करण्या साठी तसेच आगामी काळात धंदा सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी तक्रारदाराकडे 4 लाखाची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिकच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली.
 
अ‍ॅन्टी करप्शन विभागातील वरिष्ठांनी तक्रारीची खातरजमा केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी उपनिरीक्षक शिंदे यांच्या सांगण्यावरून तडजोडीअंती खासगी इसम संजय आझाद खराटे (रा. गंगानिवा, एम.जी. रोड, नाशिकरोड, नाशिक) यांनी 3 लाख रूपयाची लाच पंचासमक्ष घेतली. त्यानंतर उपनिरीक्षक महेश शिंदे आणि संजय खराटे यांच्याविरूध्द कारवाई करण्यात आली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती