सप्तशृंगी गडावर पेढे विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई

शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (08:15 IST)
आगामी नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर होणाऱ्या यात्रेत भेसळयुक्त पेढे विक्री रोखण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने सप्तशृंगगडावरील 10 पेढे विक्रेत्यांवर धाड घालून कारवाई केली आहे.
 
पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साडेतीन शक्तिपीठ यापैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गड या ठिकाणी लाखो भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यात्रेनिमित्त भाविकांकडून प्रसाद म्हणून पेढे, कलाकंद आदींची खरेदी केली जाते. त्याठिकाणी भेसळयुक्त पेढे व इतर पदार्थ विक्री रोखण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन नेहमीच तत्परतेने कार्यरत असते. त्याचाच भाग म्हणून प्रशासनाने काल सप्तश्रृंगी गडावर तपासणी मोहीम राबविली.
 
या मोहिमेत अक्षय रामचंद्र बाटे यांचे आई भगवती पेढा सेंटर, कुंडलिक ईश्वर शिंगटे यांचे भगवती पेढा सेंटर, रणजित नागनाथ सायकर यांचे आई साहेब पेढा सेंटर व हनुमंत परसु यादव यांचे पेढा विक्री केंद्र,  केशव श्रीरंग खुने यांचे आराध्या पेढा सेंटर , गोरख हरी साळुंके यांचे भगवती प्रसाद पेढा सेंटर, विठ्ठल रावसाहेब शिंदे यांचे जय माँ सप्तश्रृंगी पेढा सेंटर, संदीप नारायण अडगळे यांचे भगवती पेढा सेंटर, प्रल्हाद नामदेव गव्हाणे यांचे मयुरीप्रसाद पेढा सेंटर या 10 पेढे विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली असून, सदर ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले; परंतु त्यावर त्या पदार्थाची एक्स्पायरी डेट लिहिली नव्हती, तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या स्वच्छतेविषयक बाबींचे उल्लंघन झालेले आढळून आले.
 
सर्व पेढा विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या तरतुदीनुसार ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी  योगेश देशमुख यांनी सहआयुक्त संजय नारागुडे व सहायक आयुक्त (अन्न)  विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भाविकांनी पेढे, प्रसाद खरेदी करताना स्वच्छता असलेल्या ठिकाणाहून, तसेच नीटनेटके झाकून ठेवलेल्या ठिकाणाहून खरेदी करावे, शिळे अन्नपदार्थ खरेदी करू नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती