राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी तयार? भाजप आणि शिंदे गटाकडून कुणाला मिळणार संधी?

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (14:42 IST)
गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी विशेष चर्चेची ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेली आमदारांची यादी राज्यपालांनी शेवटपर्यंत मंजूर केली नाही. आता राज्यात सत्ता बदल झाला असून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता आमदारांची यादी परत मागविली आहे. त्यानुसार, नवीन यादी देणार असल्याचे शिंदे–फडणवीस सरकारने स्पष्ट केले आहे. या नियुक्त्यांमध्ये भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ३ आमदार होणार असल्याचे सांगितले जात आहे. या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचे बोलले जाते. मात्र, याच कुणाला संधी मिळते हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. शिंदे – फडणवीस यांचे नवे सरकार आले. यातच आता महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपालनियुक्त आमदारांची यादी रद्द करण्यात येणार असून, नव्या शिंदे – फडणवीस सरकारने नवी यादी तयार केल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
शिंदे गटाकडे ४० आमदार असल्याने त्यांचे संख्याबळ हे भाजपपेक्षा एक तृतीयांश आहे. मात्र तरीही त्यांना मंत्रिमंडळात १८ पदे मिळणार असल्याचे सांगितले जाते. यातील दोन ते तीन पदे ही अपेक्षांना देण्यात येणार असल्याने त्यांच्या गटाला १५ मंत्रिपदे मिळतील अशीही चर्चा आहे. हेच प्रमाण महामंडळे व राज्यपालनियुक्त आमदारांमध्येही लावले गेले असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहे. पुढील विस्तारात स्वतःचा समावेश करुन घेण्याची अनेकांना घाई झाली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करणे हे शिंदे गटाला मिळणाऱ्या सत्तेतील वाट्यात सगळ्यात मोठा अडसर ठरत असल्याचेही बोलले जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपद जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी विधानसभा अध्यक्षपदासह मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवत भाजपने सरकारमधील आपले वर्तस्व सिद्ध केलं आहे. या घडामोडींमुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
 
शिंदे गटात अनेकांनी मंत्रीपदासाठी गुडघ्याला बांशिंग बांधले. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. त्यातच आता राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिंदे यांचे कसब पणाला लागणार आहे. कारण आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यातून कुणाला संधी द्यायची आणि जे नाराज होतील त्यांना कसे सांभाळायचे असे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान नेत्याला संधी देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. शिंदे यांनी ज्या नेत्यांना जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख अशी जबाबदारी दिली आहे त्याच नेत्यांची आमदारपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती