महाराष्ट्रात बर्ड फ्लू पसरत असून लातूरमध्ये कावळे पडले मृत्युमुखी
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे 51 कावळे मृत्युमुखी पडले आहे. यानंतर, अधिकाऱ्यांनी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले की, शनिवारी भोपाळ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील कावळे एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1 विषाणू) मुळे मरण पावले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे म्हणाले की, शनिवारपर्यंत उदगीर शहरातील विविध भागात 51 कावळे मृतावस्थेत आढळले. 13 जानेवारीपासून अधिकाऱ्यांना उद्याने आणि शहरातील इतर भागात मृत पक्ष्यांच्या तक्रारी येत होत्या. यानंतर, अधिकाऱ्यांनी बाधित भागांना भेट दिली आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी 14 जानेवारी रोजी मृत कावळे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी मृत कावळे आढळले त्या ठिकाणाभोवतीचा 10 किलोमीटरचा परिसर 'अलर्ट झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.