राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (07:35 IST)
‘हर हर महादेव’या चित्रपटाचा खेळ बंद पाडण्यासाठी गेल्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी गृहनिर्माणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांविरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
माजीवडा येथील रहिवाशी परीक्षित धुर्वे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. धुर्वे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ते त्यांच्या पत्नीसह  ‘हर हर महादेव’ हा सिनेमा पाहण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री विवियाना मॉलमध्ये सिनेमागृहात गेले होते. त्यावेळी सिनेमा चालू असताना रात्री ९.५५ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे माजी मंत्री आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चित्रपट बंद पाडण्यांच्या उद्देशाने सिनेमागृहात शिरले. त्यांनी या ‘चित्रपटामध्ये चुकीचे दृश्य दाखविले जात असल्याने हा चित्रपट बंद करा’ असे बोलून चित्रपट बंद पाडला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती