नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) 100 खाटांचे क्रिटीकल केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अति गंभीर रुग्णांना या केंद्राचा मोठा फायदा होणार आहे. तसेच, प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र 1 कोटी 25 लाख रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. पी.एम. अभिम योजनेंतर्गत ही मंजुरी प्रदान झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. यानिमित्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
कोविड 19 साथीच्या आजाराने हे भारतालाच नव्हे तर जगाला दाखवून दिले आहे की आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे.भारतातील आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज असणे हे अति आवश्यक असल्याने यासाठी पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मंडविया यांच्या सहकार्याने आरोग्य खात्यांअंतर्गत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्यात नाशिकसाठी 100 खाटांचे अद्ययावत क्रिटीकल केअर हॉस्पिटल बांधणेसाठी 40 कोटींच्या निधी मंजूर करण्यात आला असून त्यास राज्य स्तरावरून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार,यांनी दिली.
तळागाळातील गरजू रुग्णांना सर्वसमावेशक व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी नामदार पवार यांनी पी.एम.अभीम योजनेअंतर्गत नाशिक येथे क्रिटीकल केअर हॉस्पिटल मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले होते. यात प्रामुख्याने आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग , आयसोलेशन वॉर्ड/ऑक्सिजन सपोर्टेड बेड, सर्जिकल युनिट यासारख्या सेवांनी सुसज्ज असतील. तसेच दोन लेबर, डिलिव्हरी, रिकव्हरी रूम (एलडीआर) एका नवजात केअर कॉर्नरसह इमेजिंग सुविधा, आहारविषयक सेवा, इत्यादी तसेच एकात्मिक सार्वजनिक आरोग्य लॅब भारतीय सार्वजनिक आरोग्यमानकांनुसार क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य निदान चाचण्या एकाच छताखाली अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रयोगशाळेची क्षमता, अतिदक्षता विभाग, आयसोलेशन बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि व्हेंटिलेटर यासारख्या अत्यावश्यक सेवा गरजेच्या आहेत हे कोविड 19 साथीच्या आजाराने अधोरेखित केले आहे. त्यामुळे पंतप्रधान आयुषमान भारत पायाभूत सुविधा अभियानाअंतर्गत सक्षम रोग निगराणी प्रणालीचा विस्तार आणि निर्मिती, कोविड 19 आणि इतर संसर्गजन्य रोगांवरील समर्थन संशोधन प्रदान करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधांची क्षमता व सुसज्जता वाढवण्यासाठी मदत होणार आहे. संसर्गजन्य रोगांच्या पर्यवसानातून, साथीच्या काळात, किंवा आपत्कालीन परिस्थितींसह इतर कोणत्याही परिस्थितीसाठी गंभीर काळजीची गरज असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना करणार असल्याचेही भारती पवार यांनी सांगितले.