सोलापुरात १० दिवसात ६१३ मुलं कोरोनाबाधीत

गुरूवार, 29 जुलै 2021 (17:59 IST)
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ६१३ मुले करोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागात बाधित मुलांचं प्रमाण जास्त असल्याची माहिती आहे.
 
सोलापूर जिल्ह्यात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील सुमारे १२ हजार मुलांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र यामध्ये काही दिवसांत वाढ होत असल्याचेही दिसून आली असून अगदी गेल्या दहा दिवसांत तब्बल ६१३ मुले करोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
ग्रामीण भागात बाधितांचे प्रमाण मोठे दिसून येत असले तरी या मुलांमध्ये करोनाची फारशी लक्षणे दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. या वयोगटातील लसीकरण झालेले नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
 
शहर व जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या कोरोना काळात अर्थात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आढळून आलेल्या बाधित मुलांमध्ये सर्वाधिक ११ हजार ८८६ मुले जिल्हा ग्रामीणमधील आहेत. यात ६७७३ मुले तर ५११३ मुलींचा समावेश आहे. 
 
करोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक असण्याची भीती सुरुवातीपासून व्यक्त केली जात आहे. अशात मात्र या दहा दिवसांत बाधित मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 
 
जिल्हा आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील सुमारे १० लाख मुलामुलींची आरोग्य तपासणी केली असून ६० पेक्षा अधिक मुले करोनाबाधित दिसून आली होती. शिवाय सुमारे 500 मुलांमध्ये करोनासदृश लक्षणे आढळून आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती