नागपुरात स्फोटकांच्या कंपनीत झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं ?

शुक्रवार, 14 जून 2024 (09:45 IST)
‘’मला मोठा आवाज आला. काय झालं म्हणून मी कंपनीकडे धावत धावत जात होतो. तेवढ्यात माझा जळलेला मामा तिकडून धावत कंपनीच्या गेटकडे येताना मी पाहिलं आणि तो माझ्यासमोरच खाली पडला.’’
17 वर्षीय दीपक कुंभरे याचा मामाची अवस्था सांगताना कंठ दाटून आला. त्याचा मामा ज्ञानसा मरसकोल्हे नागपूर जिल्ह्यातल्या धामणा गावाजवळच्या चामुंडी या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर नागपुरातल्या दंदे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 
स्फोटात 6 जणांचा मृत्यू
नागपूरपासून 37 किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणा गावाजवळ चामुंडी ही स्फोटके बनवणारी कंपनी आहे. इथं फटाक्यांचं देखील उत्पादन घेतलं जातं.
 
याच कंपनीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फटाक्याच्या वातीमध्ये स्पार्क झाला आणि संपूर्ण कंपनीला आग लागली.
 
यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
जखमींपैकी दोघांवर नागपुरातल्या सेनगुप्ता रुग्णालय, तर एकावर रवीनगरातल्या दंदे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोट झाला त्याठिकाणीच पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर जखमी झालेल्या श्रद्धा पाटील (वय 22 वर्ष), प्रमोद चावरे (वय 27) आणि शीतल चटप वय (30) यांना सेनगुप्ता रुग्णालयात आणण्यात आलं.
 
रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार शीतल चटप या तरुणीचा आणल्याबरोबर मृत्यू झाला होता. त्यामुळे तिचं शव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं, तर श्रद्धा पाटील आणि प्रमोद चावरे या दोघांवर अतिदक्षात विभागात उपचार सुरू आहेत.
 
कंपनीच्या समोर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. काही नातेवाईकांनी कंपनीला घेराव घालून चौकशीची मागणी देखील केली.
तसेच दीपक कुंभरे या 17 वर्षीय मुलाचा मामा ज्ञानसा मरसकोल्हे यांच्यावर दंदे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असून ते शंभर टक्के भाजले असल्याची माहिती डॉ. पिनाक दंदे यांनी दिली.
 
दीपक हा फक्त 17 वर्षांचा असून तो या कंपनीत गेल्या तीन महिन्यांपासून काम करतो. या घटनेत जखमी झालेला त्याचा मामा ज्ञानसा मरसकोल्हे यांच्यासोबत तो या कंपनीत काम करतो. मरसकोल्हे गेल्या दीड वर्षांपासून या कंपनीत काम करतात.
 
ते दोघेही कंपनीच्या परिसरात असलेल्या खोल्यांमध्येच राहायचे. याठिकाणी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातले आणखी 25-30 मजूर काम करत असल्याचं याच कंपनीत काम करणारे मजुर सुरेंद्र विश्वकर्मा यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
मृतांमध्ये पाच तरुणींचा समावेश
धामणा गावातील 20 ते 30 वर्षीय वयोगटातील तरुणींचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला आहे.
 
यामध्ये प्रांजली मोदरे (वय 22), प्राची फलके (वय 20), वैशाली क्षीरसागर (20), शीतल चटप (30), मोनाली अलोणे (27) या पाच तरुणींचा मृत्यू झाला असून या सगळ्या धामणा गावातील रहिवासी आहेत.
 
तर पन्नालाल बंदेवार या 50 वर्षीय व्यक्तीचाही यात मृत्यू झाला आहे.
 
तसेच श्रद्धा पाटील (22), प्रमोद चावरे (25) आणि ज्ञानसा मरसकोल्हे (26) यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 
'मी बघायला गेलो तर, माझ्या मुलीला अम्बुलन्समध्ये टाकलं होतं'
"माझी मोठी मुलगी सोलर कंपनीत कामाला जात होती. तिला समजलं चामुंडी कंपनीत स्फोट झाला, तर ती तिकडे गेली. तिनं आम्हाला फोन केला तर आम्ही धावत कंपनीकडे गेलो, तर माझ्या मुलीला अम्बुलन्समध्ये टाकलं होतं. आम्ही तिथून काढलं आणि पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन आलं.
 
"नागपुरातल्या शासकीय रुग्णालयात नेलं. पण तिथं तिला घेतलं नाही. तिथून सेनगुप्ता हॉस्पीटलमध्ये आलो. पण, इथूनही दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल असं डॉक्टर म्हणाले," असं सांगताना अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या 22 वर्षीय श्रद्धा पाटील यांची आई भारती पाटील यांना रडू कोसळलं.
भारती वनराज पाटील यांना तीन मुली आहेत. त्या आपल्या कुटुंबासह धामणा इथं राहतात. त्यांचे पती वनराज पाटील यांचा दोन वर्षापूर्वी अपघात झाला होता.
 
त्यामुळे मोठी मुलगी सायली सोलर कंपनीत, तर दुसऱ्या क्रमांकाची मुलगी श्रद्धा चामुंडी कंपनीत कामाला जात होत्या. श्रद्धाला दिवसाची अडीचशे रुपये रोजी मिळायची.
 
आईची शेतमुजरी आणि मुलींची मजुरी यावर घरातलं तेल-मीठ भागत होतं. पण, आता कमावणारी मुलगी श्रद्धा स्फोटात 99 टक्के भाजली. त्यामुळे त्यांना रडू आवरत नव्हतं.
 
कंपनीत स्फोट का झाला?
स्फोट झाला तेव्हा नागपूर पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं याबद्दल माहिती दिली.
 
"फटाक्यांच्या वात म्हणजे मायक्रोकोटचा स्फोट झाला. याठिकाणी दररोज त्याचं उत्पादन होतं. त्याचा साठा याठिकाणी होता. त्यामुळे आग भडकली. या कंपनीत नियम पाळले गेले की नाही त्याची चौकशी करून पुढील कारवाई करू," असं रविंद्र कुमार सिंगल म्हणाले.
स्फोटके कंपनींचा परवाना रद्द करा – अनिल देशमुख
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी नागपुरातून येऊन रुग्णालयात जखमींची सुद्धा भेट घेतली.
 
8 महिन्यांपूर्वी सोलर कंपनीत स्फोट झाला होता. यात 9 कामगारांचा मृत्यू झाला. आता धामना गावात चामुंडी या कंपनीत स्फोट झाला. यातही मजुरांचा मृत्यू झाला.
 
पण, ज्याठिकाणी स्फोटके हाताळली जातात तिथं वारंवार अशा घटना घडतात. स्फोटक विभागानं जे नियम घालून दिले त्याचं प्रत्येकानं पालन केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्घटना होणार नाही. जे स्फोटके युनिट नियमांचं पालन करत नसेल त्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली.
 
फडणवीसांनी केली मदतीची घोषणा
स्फोट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.
 
दरम्यान, ग्रामस्थांनी नागपूर-अमरावती महामार्गावर चक्काजाम केला होता. यावेळी चामुंडी कंपनी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर हिंगणा पोलिसांनी कंपनीचे मालक जयशिवशंकर खेमका यांना चौकशीसाठी हिंगणा पोलिस ठाण्यात बोलावलं होतं.
 
7 महिन्यांपूर्वी याच भागातल्या कंपनीत झाला होता स्फोट
नागपूर अमरावती महामार्गावर असलेल्या सोलर या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत डिसेंबर 2023 मध्ये स्फोट झाला होता.
 
कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला होता. यामध्ये एकूण 9 जणांचा मृत्यू झाला होता. यात 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश होता. या कंपनीत भारतीय लष्करासाठी लागणाऱ्या शस्त्रांचं उत्पादन होतं.
 
आता सात महिन्यातच स्फोटकं बनवणाऱ्या याच भागातील चामुंडी कंपनीत स्फोट झाला असून यात 6 मजुरांचा मृत्यू झालाय.
 
त्यामुळे या कंपनीत नियम पाळले जातात की नाही? असा प्रश्न विचारला जातोय. त्याची चौकशी करणार असल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं.
 
Published By- Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती