मागील काही काळापासून जळगावसह (Jalgaon) उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत असल्याने जळगावमध्ये सोमवारी तापमानाचा पारा 7.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. अशात अतिथंडीमुळरे चार जणांचा बळी गेला आहे. रात्रीच्या सुमारास सुटलेले थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संबंधित चारही जण जळगाव शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मृत चौघेही निराधार आणि बेघर आहेत. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला झोपले होते. सोमवारी रात्री ते शहरातील विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौकात, दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर तिसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात आढळला आहे. तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला आहे.