यामध्ये न्यायालयाने मागील 20 वर्षांपासून फरार घोषित केलेले 15, स्टॅण्डींग वॉरंटमधील 51, पोटगी वॉरंटमधील एक आणि उच्च न्यायालयाने शिक्षा कायम केलेला एक आरोपींचा समावेश आहे.
या विशेष मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते. कोणी खून करून, तर कुणी दरोडा टाकून अनेक वर्षापासून पोलीस यंत्रणेला गुंगारा देऊन ओळख लपून खुलेआम वावरणार्या फरार 68 गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायालयाने जिल्ह्यातील 45 फरार आरोपींचे जाहीरनामे प्रसिद्ध करून त्यांना फरार घोषित केले होते. तसेच न्यायालयात हजर न राहिल्यामुळे 51 आरोपींविरुद्ध स्टँडिंग वॉरंट काढण्यात आले होते. या फरार आरोपींना अटक करणे तसेच स्टँडिंग वॉरंट बजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी तसेच शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मागील 20 वर्षापासून फरार आरोपीनाही अटक करण्यात आली आहे.