गोदावरीच्‍या पुराचा मराठवाड्यालाही फटका

WD
नाशिकसह परिसरात सुरू असलेल्‍या जोरदार पर्जन्‍यवृष्‍टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून त्‍यामुळे पैठणचे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पूर्ण भरल्‍याने धरणातून दीड लाख क्‍युसेक्‍स पाणी सोडण्‍यात आले आहे. नदीच्‍या काठावर असलेल्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला असून अनेक ठिकाणच्‍या ग्रामस्‍थांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

जायकवाडी धरणाने 18 सप्‍टेंबरची धोक्‍याची पातळी ओलांडल्‍याने विभागीय आयुक्‍तांनी धरणाचे 18 दरवाजे उघडण्‍याचे आदेश दिले असून काल धरणातून 18 हजार 300 क्‍युसेक्‍स विसर्ग संततधार पावसामुळे वाढून आता दीड लाखापर्यंत गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्‍यास उद्या 2 लाख क्‍युसेक्‍स पाणी सोडण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे काठावरील गावांनी सतर्क रहावे असा इशारा विभागीय आयुक्‍त दिलीप बंड यांनी दिला आहे.

काठावरील गावांतील लोकांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍याचे काम सुरू असून त्‍यांची व्‍यवस्‍था तात्‍पुरता परिसरातील शाळांमध्‍ये करण्‍यात आली आहे. सुमारे 218 गावांना या पुराचा फटका बसला आहे.

या पुराचे पाणी औरंगाबाद, परभणी, बीडसह नांदेडमध्‍येही येत्‍या 48 तासांत पोचण्‍याची शक्‍यता आहे.
(वरील छायाचित्र- अरूण तळेकर)

नाशिकमध्‍ये गोदावरीला महापूर

वेबदुनिया वर वाचा