उध्दव यांची मागणी म्हणजे उशिराचे शहाणपण : विखे

गुरूवार, 5 मे 2016 (11:08 IST)
केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी ही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मागणी म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली. कर्जमाफीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमं‍त्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
मागील चारही आधिवेशनात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही केली. तेव्हा मात्र शिवसेना गप्प बसली होती. आता अचानक शिवसेनेला शेतकरी कर्जमाफीची आठवण कशी झाली, हेच मोठे आश्चर्य आहे. 
 
शेतकरी कर्जमाफीची मागणी आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे शिवसेना कर्जमाफीच्या मागणीवर ठाम असेल तर त्यांनी सरकारवर यासंदर्भात तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी दबाव आणावा. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर पंधरा दिवसात कर्जमाफीची घोषणा करता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 

वेबदुनिया वर वाचा