अन्यथा केजरीवालांसोबत बदनाम झालो असतो: अण्णा हजारे

बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (10:05 IST)
अहमदनगर- चारा घोटाळ्यात तुरुंगवास भोगलेल्या लालुप्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्याने टीकेचे धनी झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांचे एकेकाळचे गुरू व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निशाणा साधला आहे. बरे झाले, केजरीवालांची साथ सोडली, नाही तर त्यांच्यासोबत माझीही बदनामी झाली असती, असे म्हणत अण्णांनी केजरीवालांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
 
नुकत्याच झालेल्या नितिशकुमार यांच्या शपथविधी सोहळयात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लालुप्रसाद यादव यांची व्यासपीठावर गळाभेट घेतली होती. लालुप्रसाद यादव यांनी चारा घोटाळय़ाप्रकरणी तुरुंगवास भोगला आहे. तर भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन देणाऱ्या केजरीवालांनी लालुप्रसादांची गळाभेट घेतल्याने देशभरातून केजरीवालांवर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी दिल्लीत ठिकठिकाणी फलक उभारून केजरीवालांचा बुरखा फाडला आहे. तर त्यांचे एकेकाळचे सहकारी प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनीही केजरीवालांवर शरसंधान साधले आहे.
 
केजरीवाल वादात अडकले असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावर तोफ डागली आहे. लालूंना मिठी मारून केजरवालांनी मोठी चूक केली. आता मी केजरीवालांसोबत नाही हे बरे झाले. अन्यथा लोकांनी माझ्यावरही चिखलफेक केली असती, अशी प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा