रमझान महिना संपल्यावर जेंव्हा प्रथम चंद्र दर्शन होते तेंव्हा ईद साजरी होते. रमझान-ईदच्या दिवशी नवे-नवे कपडे लेऊन, एकमेकांना आलिंगन देऊन ईदची 'मुबारक बात' दिली जाते. मटण, चिकन, वेगवेगळ्या बिर्याण्या, गोडधोड पदार्थ, सुकामेवा ह्यांची रेलचेल असते. एकमेकांच्या घरी 'ताटे' पाठविण्याचाही प्रघात आहे. १०-१२ वर्षाच्या मुली कलाबुतींनी मढविलेले वस्त्रप्रावर्ण लेऊन ही 'ताटे' आपापल्या नातेवाईकांकडे, ओळखीच्यांकडे घेऊन जाताना दिसतात. गरीबांची मुले घरोघर 'ईदी' (बक्षीस) मागत फिरतात. (त्या भीक म्हणत नाहीत) 'ईदी' कोणीही कुणालाही (वयाने मोठी व्यक्ती, लहान व्यक्तीस) गरीब श्रीमंत भेदभाव विसरुन देऊ शकतो. राजाही ईदीचा हकदार असतो. घरात आई-वडील, मोठे बहीण-भाऊ लहानांना 'ईदी' म्हणून पैसे, वस्तू देऊन खूष करतात.