केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी महाडिकांच्या तिसऱ्या जागेबाबत शंका निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. ही जागा कशी निवडून आणायची त्याची स्ट्रॅटेजी ठरलीय. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत, असे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यसभेसाठी दिलेले तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. राजकीयदृष्टय़ा ते सक्रीय आहेत. त्यामुळे आमदार सदसदविकेबुद्धीने आमच्या उमेदवारांना मतदान करतील. आम्ही विचार करुनच तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ही तिसरी जागा कशी निवडून आणायची याचीही स्ट्रॅटेजी ठरली आहे. पण अशा गोष्टींची मीडियात चर्चा करायची नसते.
भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. ज्यांना घोडेबाजाराजी भीती वाटत असेल त्यांनी आपला उमेदवार मागे घेऊन प्रश्न मिटवून टाकावा. दरम्यान, सध्याच्या संख्याबळानुसार दोन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. मात्र, सहावी जागा जिंकण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या जागेवरून चुरस निर्माण झाली आहे.