काय सांगता ! होय, म्हणून पुण्यातील ‘या’ ग्रामपंचायतीनं गावभर वाटले कंडोम

शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (15:29 IST)
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे राज्यातील झिका विषाणूचा (zika virus) पहिला रुग्ण आढळला आहे.यानंतर संपूर्ण आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहेत. झिकाला रोखण्यासाठी नागरिकांच्या तपासण्या करण्याबरोबरच विविध प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून गावातील महिलांनी पुढील किमान चार महिने गर्भधारणा टाळली पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तर ग्रामपंचायतीकडून कंडोमचं (condom) वाटप करण्यात आलं आहे.

दरम्यान, पुरुषांच्या विर्यात झिका विषाणू (Zika Virus) आढळत असल्यानं पुढील चार महिने लैंगिक संबंध (physical relation) टाळावेत, किंवा सुरक्षित पद्धतीनं शरीरसंबंध ठेवावेत, असंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे बेलसर गावात तर सर्वत्र भीतीच वातावरण पसरलं आहे.

बेलसर येथे झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. 55 वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतर झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढचे तीन महिने कुठलीही महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे.

झिका विषाणूची लागण एडिस एजिप्त डासापासून होते. गरोदर महिलांना या विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. झिका विषाणूमुळे गरोदर महिलांच्या पोटातील बाळावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. बाळाच्या मेंदूची वाढ खुंटू शकते. तसचे अकाली प्रसूती होण्याचा धोकाही अधिक असतो. पुरुषांच्या विर्यात तब्बल चार महिने झिका विषाणू जिवंत राहू शकतो. त्यामुळे गावातील महिलांनी तीन महिने गर्भधारणा टाळली पाहिजे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.दरम्यान झिकाबाबत विविध ठिकाणी फलक लावून जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती