नाशिकच्या महिला व बाल कल्याण समितीच्या शिष्टमंडळाची महापालिकेस भेट

बुधवार, 7 जुलै 2021 (15:56 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेने महिलांसाठी राबविलेल्या योजना चांगल्या असून त्या अनुकरणीय असल्याचे, मत नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांनी व्यक्त केले. महिला व बालकांच्या उत्थानासाठी आखलेल्या योजना प्रशंसनीय असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा यासाठीचा दूरदृष्टीकोन सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे असेही त्या म्हणाल्या.
 
सभापती स्वाती भामरे यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस भेट देऊन नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांची माहिती घेतली. त्यावेळी प्रतिक्रीया देताना सभापती भामरे बोलत होत्या. शिष्टमंडळामध्ये महिला व बाल कल्याण समिती सदस्या पुनम मोगरे, नयना गांगुर्डे, रंजना बोराडे, समिना मेनन, माधुरी बोलकर यांचा सहभाग होता.
 
महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सभापती भामरे यांच्यासह शिष्टमंडळाचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.  यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, योगिता नागरगोजे, माधवी राजापुरे, सुनिता तापकीर आदी उपस्थित होत्या.
 
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या कामाची चित्रफीत शिष्टमंडळाला दाखविण्यात आली. महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये शिष्ट मंडळा समवेत या योजनांबद्दल चर्चा झाली. नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपआयुक्त अजय चारठणकर आणि समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी नागरवस्ती विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध विभागांची माहिती दिली. यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती