आदर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, "नोव्हावॅक्ससोबत संयुक्त भागीदारीमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोव्होवॅक्सची निर्मिती करत आहे. आफ्रिका आणि युकेमध्ये सापडलेल्या कोव्हिड 19 च्या नवीन व्हेरिएंटवरही या लशीची चाचणी करण्यात आली आहे. ही लस जवळपास 89 टक्के परिणामकारक ठरली आहे."
अमेरिकेतली बॉयोटेक कंपनी नोवावॅक्सनं ही लस तयार केली आहे. NVX-CoV2373 असं या लशीचं मूळ वैज्ञानिक नाव आहे. ही लस कोव्हिडच्या मूळ कोरोनाविषाणूविरोधात 96.4 टक्के काम करत असल्याचं युकेमध्ये झालेल्या तिसऱ्या फेजच्या चाचण्यांमध्ये दिसून आलं आहेत. तसंच युके आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूला रोखण्यातही ही लस यशस्वी ठरत असून, तिची एकूण परिणामकारकता 89 टक्के असल्याचं कंपनीनं जाहीर केलं आहे. जानेवारीमध्ये यासंदर्भातली माहिती कंपनीनं जाहीर केली होती. या लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिट्यूटनं नोवावॅक्स या कंपनीशी करारही केला आहे. मात्र प्रत्यक्षात सामान्य लोकांपर्यंत ही लस पोहोचेपर्यंत किमान काही महिने जाऊ शकतात. सध्या या लशीच्या भारतातील चाचण्यांना सुरुवात झाली असून, सप्टेंबरपर्यंत ती लसीकरणासाठी उपलब्ध होईल अशी आशा आदर पूनावाला यांनी व्यक्त केली आहे. देशभरात १९ ठिकाणी ही चाचणी घेतली जाणार असून, त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, पॉण्डिचेरी, ओडिशा, कर्नाटक आणि पश्चिम बंगलाचा समावेश असेल. महाराष्ट्रात पुण्यामध्ये चार ठिकामी या लशीची चाचणी घेतली जाणार आहे, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे. कोवोव्हॅक्स ही लस ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेकासह सीरमनं तयार केलेल्या कोव्हिशील्डपेक्षा जास्त प्रभावी आहे.
भारतात सध्या सर्वाधिक पुरवठा कोव्हिशील्डचा होत असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हॅक्स मोहिमेअंतर्गत कोव्हिशील्ड लशीचा पुरवठा अविकसित देशांना केला जातो आहे. युरोपातही कोव्हिशील्डची निर्यात केली जाते आहे.